ताज्या बातम्या

गोपाळ शेट्टी एक मे पासून रस्त्यावर उतरणार ; जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

मुंबई : मी एक मे पासून रस्त्यावर उतरणार असून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा उत्तर मुंबई चे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, मी आमदार नसलो, खासदार नसलो तरी काय झाले ? मी एक जनसेवक आहे. उत्तर मुंबई आणि बोरीवली च्या लोकांनी माझ्यावर अतोनात प्रेम केले आहे. मला या लोकांनी भरभरून दिले आहे. आता या जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी माझी आहे. केंद्रात भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे, राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे आणि आता तर मुंबई महापालिकेच्या सत्तेची सूत्रे सुद्धा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या हाती आली आहेत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि आपल्याच सत्ताधारी लोकांकडून लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी मला रस्त्यावर उतरावेच लागेल आणि मी स्वस्थ बसणार नाही एक मे पासून मी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी तो केल्याशिवाय राहणार नाही, असे गोपाळ शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. यावेळी संगीत संयोजक नीलेश माळी आणि प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर हेही आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन करतांना जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे संयोजक प्रा नयना रेगे यांनी गोपाळ शेट्टी हे आम्ही आजही आमचे खासदार आहेत असेच आम्ही मानतो त्यामुळे आम्ही त्यांना हक्काने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमास आवर्जून बोलावतो, असे सांगितले. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे संयोजक सचिन वगळ यांनी गोपाळ शेट्टी यांना शाल, सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन सन्मानित केले. संगीत संयोजक नीलेश माळी यांनाही यावेळी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे संयोजक वैभव विजय वैद्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नीलेश माळी हे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमामुळे अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या वाद्यवृंदातर्फे एक कार्यक्रम विनामूल्य देण्याचे अभिवचन दिले. रेखा बोऱ्हाडे आणि कांचन सार्दळ यांनी मंदार आपटे, अर्चना गोरे आणि श्रेयसी मंत्रवादी यांच्या समवेत राष्ट्रगीत गायिले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Scroll to Top