ताज्या बातम्या

पनवेल महानगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय: कुष्ठरुग्णांसाठी राज्यातील पहिले विनामूल्य घरकुल प्रकल्प

पनवेल : महाराष्ट्रात प्रथमच कुष्ठरुग्णांसाठी विनामूल्य घरे उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून पनवेल महानगरपालिका राज्यात आदर्श निर्माण करत आहे. आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारत असल्याची माहिती सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी महासभेत दिली.
महासभेत विविध विकासकामांवर चर्चा करताना प्रकाश बिनेदार यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सविस्तर उत्तर देत पालिकेच्या कामकाजाचे विश्लेषण मांडले. जयंती उत्सवांदरम्यान भाडेतत्त्वावर आकर्षक विद्युत रोषणाई, पनवेल (पूर्व) सेक्टर १ येथे पावसाळी गटार बांधकाम, वृक्षलागवड व संगोपन यांसारखे विषय मंजूर करण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरवठ्याचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला.
शहरातील मलप्रक्रिया केंद्र (STP) दुरुस्ती, पंप नियोजन, खारघर सेक्टर ३६ मधील रस्त्यांचे मजबुतीकरण, विविध प्रभागांत पावसाळी पाणी उपसा यांसारख्या कामांना प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात आली. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मेडिकल गॅस पाइपलाईन तसेच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणेसंदर्भातील प्रस्तावही मंजूर करण्यात आले.
लोकमान्य नगर, मालधक्का येथील झोपडपट्टी पुनर्वसन विषयावर बोलताना बिनेदार यांनी विरोधकांच्या अपूर्ण माहितीवर टीका करत वस्तुस्थिती स्पष्ट केली. कुष्ठरुग्णांसाठी उभारण्यात येणाऱ्या घरकुल प्रकल्पात कोणतीही तडजोड न करता पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून मासिक सहाय्य ₹४,००० पर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा नियमित अहवाल ठेवून निष्काळजीपणावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील बेकायदेशीर हातगाडे, वाढती असुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही सभागृहात चिंता व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, मागासवर्गीय कल्याण निधी व दिव्यांग निधीचा योग्य वापर करून दीर्घकालीन समाजोपयोगी प्रकल्प राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नवीन पनवेल, खारघर, कामोठे व कळंबोली येथे महापुरुषांच्या नावाने बहुउद्देशीय भवन उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
महापौर नितीन पाटील, विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, आयुक्त तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पारदर्शक व विकासाभिमुख कामकाजावर समाधान व्यक्त करत महासभेची सांगता करण्यात आली.

Scroll to Top