ताज्या बातम्या

मसूर येथील श्री शिवाजी विद्यालयाची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

कराड(प्रताप भणगे) : मसूर येथील श्री शिवाजी विद्यालय या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे.
या परीक्षेत विद्यालयातील कु. श्रावणी सचिन जाधव हिने सर्वसाधारण गटात राज्यात ४७ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली, तर हर्षवर्धन महेश शिरतोडे याने विशेष विमुक्त जाती गटात राज्यात ९ वा क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय, विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनीही ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शिवाजी पवार, ज्येष्ठ शिक्षिका मनीषा गोरे तसेच शिक्षकवृंदात सतीश गायकवाड, परवीन मुजावर, प्रशांत माने, राजेंद्र जाधव, प्रशांत नामदास आणि संजय चौगुले उपस्थित होते.
शिष्यवृत्ती अंतर्गत श्रावणी जाधव हिला प्रति वर्ष ₹१२,००० प्रमाणे चार वर्षांसाठी एकूण ₹४८,०००, तर हर्षवर्धन शिरतोडे याला प्रति वर्ष ₹१५,००० प्रमाणे चार वर्षांसाठी एकूण ₹६०,००० इतकी आर्थिक मदत मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील, खजिनदार संजय बदीयानी तसेच सर्व संचालक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top