मुंबई (रत्नकांत सावंत) : जी-उत्तर विभागातील संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने महापुरुष व महामाता यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले. गेली सुमारे ५० वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या या समितीने दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी विविध उपक्रम राबवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधले.
या निमित्ताने कॅरम, बुद्धीबळ तसेच कराओके स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर. या शिबिराला कामगार, कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे आतापर्यंत ४५ वेळा रक्तदान केलेले श्री राजेश भावसार (धारावी) यांनी पुन्हा एकदा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचा समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जी-उत्तर विभागातून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना भारताचे संविधान आणि त्याच्या उद्देशिकेची फोटो फ्रेम भेट देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच नव्याने नियुक्त सहाय्यक आयुक्त मा. योगेश देसाई यांचेही समितीच्या वतीने स्वागत करून त्यांना संविधानाची प्रत देण्यात आली. आपल्या मनोगतात देसाई यांनी सांगितले की, “महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करणे महत्त्वाचे आहेच, पण त्यांच्या विचारांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे अधिक आवश्यक आहे.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष विकास थोरात, सचिव मनोज सागरे, कार्याध्यक्ष संदीप जाधव, तसेच विनोद शिर्के, प्रविण सोलंकी, विठ्ठल मोरे आणि ज्येष्ठ सल्लागार राजाराम पुरळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांना भोजनदान देऊन करण्यात आली.




