मुंबई : मुंबईसह राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सलग दोन महिने विलंब होत असल्याने सर्व राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणींचे कारण देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काही महिन्यांपासून उशिराने होत आहे. फेब्रुवारी 2026 चे वेतन 13 मार्च नंतर झाले. तर मार्च महिन्याचे वेतन बिल अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाही. वेळेवर हफ्ते न भरल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गृहकर्जाच्या हप्त्यांवर दंड भरावा लागतो आहे. थकीत बिलासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही शिक्षण विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निदर्शने करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिला आहे.
कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करणे, ई केवायसी करणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे, मंजूर पदापेक्षा अतिरिक्त पदाचे वेतन न देणे इत्यादी अनेक कारणांमुळे शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर तांत्रिक अडचणींची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्षात किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्या कालावधीत संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवणे न्यायोचित ठरणार नाही.
शून्य शिक्षकी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्यात आले आहेत. परंतु या शाळेमध्ये विद्यार्थी असून अध्ययन अध्यापन सुरू आहे. पॅट परीक्षा आणि वार्षिक मूल्यमापन करण्यासाठी हे अतिरिक्त शिक्षक शाळेमध्ये काम करत आहेत. त्यांचे समायोजन होईपर्यंत पगार बंद करू नयेत, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.
स्कूल रेकॉर्ड डिजिटलायझेशन, अतिरिक्त शिक्षक किंवा संच मान्यतेमधील अडचणी, ई केवायसी इत्यादी तांत्रिक अडचणी दूर करण्याची प्रक्रिया समांतर सुरू ठेवावी. त्यासाठी वेतन प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे. कामाचा पगार मिळणे हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. एक तारखेला पगार देणे शिक्षण विभागाची नैतिक जबाबदारी आहे. पगारास तांत्रिक अडचणींचे कारणे देऊन विलंब करण्याच्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा तीव्र निषेध शिक्षक भारती संघटना करत आहे. दोन दिवसात पगार न झाल्यास शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती सुभाष मोरे यांनी दिली.




