मुंबई(रमेश औताडे) : अनेक वर्षांपासून मूलभूत हक्कांसाठी झगडणारा मातंग समाज आजही आश्वासनांच्या सावलीत उभा आहे. प्रत्येक वेळी आंदोलन, निवेदन, बैठका आणि घोषणा होतात. पण प्रत्यक्षात बदल मात्र काहीच नाही. सरकारकडून वारंवार दिली जाणारी आश्वासने आता केवळ शब्दांचे ओझे बनली आहेत, असा संतप्त सवाल भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी सरकारला केला आहे.
३० ऑगस्ट २०२२ रोजी आझाद मैदानात आंदोलन केले. अ ब क ड उपवर्गीकरण करावे अशी मागणी केली. शिक्षण, नोकरी, घरे, आरोग्य आणि सामाजिक सन्मान या सर्व बाबतीत मातंग समाज आजही मागेच आहे. अनेक कुटुंबे अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये, असुरक्षित परिस्थितीत जीवन जगत आहेत. तरुणांच्या डोळ्यांत स्वप्न आहेत, पण त्या स्वप्नांना आधार देणारी ठोस योजना दिसत नाही.
समाजातील तरुणाईत रोष आणि अस्वस्थता वाढत चालली आहे. काहींनी तर आयुष्यभर लढा देऊनही हातात काहीच न लागल्याची वेदना व्यक्त केली. “आम्ही किती वर्षे थांबायचं?” हा प्रश्न आता अधिक तीव्र होत आहे. जर सरकारने लवकरच ठोस निर्णय घेतला नाही, तर महाराष्टभर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी सरकारला दिला आहे.




