कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील तुळसण कोळेवाडी खिंड परिसरात सध्या बेकायदेशीर वाहतुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या भागातून सर्रासपणे विना नंबर प्लेटच्या गाड्यांद्वारे वाहतूक केली जात असून, अनेक वाहने ओव्हरलोडिंग करून रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या खिंडीतून जाणाऱ्या अनेक गाड्यांवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसते. काही वाहनांवर नंबर अस्पष्ट किंवा जाणूनबुजून झाकलेले असतात. याशिवाय नियमांचे उल्लंघन करत वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर हानी होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “शासकीय नियम फक्त खाजगी वाहनधारकांसाठीच आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कारण सर्वसामान्य नागरिकांवर नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कारवाई केली जाते, मात्र अशा बेकायदेशीर वाहतुकीकडे डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येते.
तुळसण कोळेवाडी खिंडीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन विना नंबर प्लेट व ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




