मुंबई : जनता दल (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान श्री. एच.डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी श्री. सुरेंद्रकुमार बाजपेयी यांची मुंबई जनता दल (सेक्युलर) च्या अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. श्री. बाजपेयी यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, आता त्यांच्यावर महानगरातील पक्षाच्या पुनरुज्जीवनाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेले श्री. बाजपेयी हे व्यवसायाने संगणक अभियंता (Computer Engineer) आणि वकील असून, त्यांच्या तांत्रिक आणि कायदेशीर कौशल्याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे म्हणाले की, पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत करण्याच्या भविष्यातील रणनीतीनुसार श्री. बाजपेयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या नियुक्तीनंतर श्री. बाजपेयी यांनी राष्ट्रीय आणि प्रदेश नेतृत्वाचे आभार मानले आणि एका सर्वसमावेशक मुंबईचे व्हिजन मांडले. ते म्हणाले, “मी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आमचा मुख्य भर सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यावर असेल. मुंबईतील प्रस्थापित राजकीय पक्षांना एक भक्कम आणि व्यवहार्य समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष पर्याय म्हणून जनता दल (एस) ला उभे करण्याचे आमचे ध्येय आहे.” श्री. बाजपेयी यांच्यासोबतच हाजी सलीम भट्टी यांची मुंबई जनता दल (एस) च्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सलीम भाटी म्हणाले की, आम्ही अल्पसंख्याक समुदायाच्या समस्यांना वाचा फोडू, ज्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई जनता दल (एस) चे मावळते अध्यक्ष प्रभाकर नारकर यांची आता महाराष्ट्र जनता दल (एस) चे कार्याध्यक्ष आणि प्रधान सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सुरेन्द्रकुमार बाजपेयी यांच्याशी 7777000173 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




