ताज्या बातम्या

मालवणी कलाकारांना डावललं जातंय? दिगंबर नाईक यांची खंत व्यक्त

मुंबई (ओमकार भिमराव धुळप) : मराठी मालिकाविश्वात कलाकारांच्या निवडीवरून पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठी अभिनेते दिगंबर नाईक यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे हा विषय पुढे आला आहे.

नाईक यांनी सांगितले की, “आदेश बांदेकर मालवणीच आहे, माझा मित्र आहे. पण ‘लक्ष्य’ या मालिकेतून मला अचानक रात्री पावणे बारा वाजता काढण्यात आलं.
त्या वेळी चॅनेल हेड श्रावणी देवधर होत्या. त्यांचं म्हणणं होतं की, ‘हा कॉमेडी करतो, गंभीर भूमिका कशी करणार?’”
यावर बोलताना त्यांनी खंत व्यक्त करत प्रश्नही उपस्थित केला. “आपण दोघंही मालवणी आहोत, मग मला संधी द्यावी असं त्यांना वाटलं नाही का?” असं नाईक म्हणाले.

“आज परिस्थिती अशी झाली आहे की, मालवणी विषयावर मालिका असली तरी त्यात मालवणी कलाकारच दिसत नाहीत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या वक्तव्यानंतर मराठी मनोरंजन क्षेत्रात कास्टिंगच्या निकषांवर चर्चा सुरू झाली आहे.
कलाकार निवडताना कौशल्याला प्राधान्य द्यावं की प्रादेशिकओळखीलाही संधी द्यावी, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Scroll to Top