ताज्या बातम्या

पत्रकारांच्या सुख-दुःखात साथ देणे हीच समूहाची ओळख – डॉ. विश्वासराव आरोटे…… दैनिक समर्थ गांवकरी मेळाव्यात मार्गदर्शन; संघर्षातून उभ्या राहिलेल्या व्यक्तींनाच व्यासपीठ देण्याचा संकल्प!

कोकमठाण : दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आयोजित संपादक, जिल्हा प्रतिनिधी व वार्ताहर मेळाव्यात संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करताना संघटित राहण्याचे आवाहन केले. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा…” या मंत्रोच्चाराने त्यांनी भाषणाची सुरुवात करत पत्रकार हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचे सांगितले.

डॉ. आरोटे म्हणाले की, दैनिक समर्थ गांवकरी समूह दरवर्षी ग्रामीण भागातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करतो. वर्षभर विविध भागात काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि संवादाची साखळी मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या व्यासपीठावर राजकीय नेते किंवा पदाधिकारी यांना प्राधान्य न देता संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करण्याची परंपरा समूहाने जपली असल्याचे त्यांनी सांगितले.

याच अनुषंगाने शिवनेरी-जुन्नर भागातील शेतकरी कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेल्या बिग बॉस फेम तथा सरकार सेना संघटनेच्या अध्यक्षा दिव्या शिंदे यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार, आमदार किंवा मंत्री यांचा कार्यकाळ मर्यादित असतो; मात्र संघर्षातून उभ्या राहिलेल्या व्यक्ती समाजाला प्रेरणा देतात, त्यामुळे अशा व्यक्तींना व्यासपीठ देणे ही समूहाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी समूहाचे मालक नानजीभाई ठक्कर, कार्यकारी संपादक नवनाथ जाधव, नवी मुंबईचे संपादक दशरथ चव्हाण, व्यवस्थापक संजय फुलसुंदर यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधी व वार्ताहर उपस्थित होते.

डॉ. विश्वासराव आरोटे पुढे म्हणाले की, समूहातील बहुतांश पत्रकार हे तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. संघर्षमय परिस्थितीत काम करत असताना त्यांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जावे यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. पत्रकार वर्षभर जनतेचे प्रश्न मांडतात; मात्र पत्रकारांवर संकट आले तर त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि मदतीचा हात पुढे करणे ही संघटनेची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यांत पत्रकारांच्या मदतीसाठी आपण काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले. “सुखात नव्हे तर दुःखात साथ देणे” हीच संघटनेची भूमिका असल्याचे सांगताना त्यांनी अनेक प्रसंगांचा उल्लेख केला. पत्रकारांवर अन्याय झाला किंवा दुर्दैवी घटना घडली तर संबंधित संस्थांकडून अपेक्षित मदत मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा वेळी संघटित पत्रकारांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारितेतील अस्थिरता, मान्यता व संरक्षणाचा अभाव या मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी शासनाकडून पत्रकारांच्या व्याख्येबाबत स्पष्ट धोरण नसल्याचे सांगितले. अनेक वर्षे काम करूनही पत्रकारांना पेन्शन, विमा किंवा इतर सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकारांवर अन्याय झाल्यास किंवा त्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्यास समूह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले की, अनेकदा पत्रकारांनी मेहनतीने काम करूनही जाहिरातींचे किंवा कामाचे पैसे मिळत नाहीत. अशा वेळी पत्रकारांवर उलट गुन्हे दाखल केले जातात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. “जर एखाद्या पत्रकाराने फसवणूक केली असेल तर तो गुन्हा आहे; पण लोकांनी पैसे न देता उलट पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. वीस वर्षे पत्रकारिता करून व्यवसाय गमावलेला असताना त्याच्यावर कारवाई करणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार कुटुंबांची परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी समूहाच्या माध्यमातून गरजू पत्रकारांना मदत केल्याची उदाहरणे दिली. एखाद्या पत्रकाराच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांची मदत, गॅस कनेक्शन, वैद्यकीय सहाय्य, आपत्कालीन आर्थिक मदत अशा विविध स्वरूपात मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. “ही मदत उपकार म्हणून नाही; विश्वासाच्या नात्याने केली जाते,” असे त्यांनी नमूद केले.
डॉ. आरोटे पुढे म्हणाले की, सुमारे २७ हजार पत्रकारांच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना कोणत्या संघटनेचा पत्रकार आहे यापेक्षा तो पत्रकार आहे हे महत्त्वाचे मानले जाते. संकटात असलेल्या पत्रकाराला तत्काळ मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे. पत्रकारांनी समाजाचे प्रश्न मांडताना आपल्या कुटुंबाकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक समर्थ गांवकरी समूहाने पत्रकारांसाठी विमा योजना, आर्थिक मदत, सन्मान सोहळे आणि मार्गदर्शन कार्यक्रम राबविले असून पुढेही हे कार्य सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आपण काय देतो यापेक्षा देण्यामागचा हेतू महत्त्वाचा असतो. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे सांगत त्यांनी सर्व पत्रकारांना संघटित राहण्याचे आवाहन केले.

Scroll to Top