ताज्या बातम्या

धगधगती मुंबईच्या बातमीचा दणका; रखडलेले घरकुल हफ्ते अखेर जमा कराड तालुक्यातील हजारो कुटुंबांना दिलासा; रखडलेली कामे पुन्हा मार्गी

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून मागील तीन महिन्यांपासून रखडलेले हफ्ते अखेर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात सध्या सुमारे ५५५५ घरकुलांची कामे सुरू आहेत. शासनाकडून घरकुल योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते, तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून २७ हजार रुपये मिळतात. या निधीचे हफ्त्यांमध्ये वितरण करण्यात येते. त्यानुसार सुरुवातीला १५ हजारांचा पहिला हफ्ता, त्यानंतर ७० हजारांचा दुसरा, ३० हजारांचा तिसरा आणि शेवटी ५ हजारांचा अंतिम हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
मात्र मागील तीन महिन्यांपासून दुसरा, तिसरा व अंतिम हफ्ता रखडल्याने अनेक लाभार्थ्यांना घरबांधणीची कामे थांबवावी लागली होती. काहींची घरे पूर्ण होऊनही शेवटचा हफ्ता मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या गंभीर प्रश्नावर धगधगती मुंबई वृत्तपत्राने सातत्याने प्रकाश टाकत आवाज उठवला. धगधगती मुंबईच्या बातमीचा दणका बसल्यानंतर शासनाने तात्काळ दखल घेत कारवाई केली. अवघ्या पंधरा दिवसांतच रखडलेले हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून निधी वितरणाला वेग आला असून अनेक लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळू लागला आहे. त्यामुळे रखडलेली घरकुलांची कामे पुन्हा सुरू होण्यास गती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील घरकुलधारकांनी समाधान व्यक्त करत धगधगती मुंबई वृत्तपत्राचे विशेष आभार मानले आहेत.

Scroll to Top