कराड : कराड तालुक्यातील मौजे घोगाव येथील काही गट क्रमांकांच्या जमिनीवरून वाद निर्माण झाला असून, संबंधित मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, असा इशारा जाहीर नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
अशिल श्रीमती मालन शिवाजीराव माने व बाळकृष्ण दत्तु भेदाटे यांच्या वतीने अॅड. रोहित संजय माळी यांनी ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गट क्रमांक ८८, ८९ व १३ या वडिलार्जित मिळकती असून गट क्रमांक ८८ मध्ये भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप हक्कासह अस्तित्वात आहे. तसेच गट क्रमांक ५४ मधील सुमारे ५२ गुंठे जमीन हीही संबंधितांची कायदेशीर मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, या मिळकतींच्या नोंदींमध्ये तांत्रिक त्रुटीमुळे महादेव दत्तु भेदाटे यांच्या नावाची नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नोंदीच्या आधारे काही जणांकडून खरेदी-विक्रीसारखे व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी संबंधित मिळकतीबाबत खरेदी, विक्री, गहाण, दान किंवा अन्य कोणताही व्यवहार करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा असे व्यवहार संबंधित अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत, तसेच आवश्यकतेनुसार दिवाणी किंवा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.



