महाबळेश्वर : सह्यशिवालय जंगम समाजाच्या वतीने शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत भव्य धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विविध मान्यवर शिवाचार्य महाराजांचे मार्गदर्शन लाभणार असून धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा जागर होणार आहे.
या धर्म संमेलनात प्रमुख उपस्थिती म्हणून श्री प. प्र. १०८ राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, प्रभूदेव शिवाचार्य माळेकर महाराज (बार्शी), बालेश्वर भक्ती भंडारी महाद्रया रविशंकर शिवाचार्य रायपाटणकर महाराज, ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज आणि शिवानंद शिवाचार्य महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजपुरोहित प्रकाश स्वामी जगम करणार आहेत.
रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. एच. बी. जंगम यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, मंत्री मकरंद पाटील तसेच खासदार नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात शिवाचार्य महाराजांचे आगमन, मिरवणूक, सत्कार, मनोगते, आशीर्वचन आणि शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एच. बी. जंगम यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपटही प्रदर्शित केला जाणार आहे.त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




