कराड(प्रताप भणगे) : येळगाव फाटा ते येळगाव दरम्यान Maharashtra State Electricity Distribution Company Limited (एमएससीबी) तर्फे उभारण्यात आलेले वीज पोल (डांब) अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. या कामाबाबत वारंवार तक्रारी व बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस सुधारणा केलेली नसल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारांकडून दर्जाहीन कामे मोठ्या प्रमाणात केली जात असून, अनेक ठिकाणी पोल थेट गटारात उभे करण्यात आले आहेत. काही ठिकाणी गटाराच्या कडेला अस्थिर पद्धतीने पोल बसवण्यात आले असल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच उभारण्यात आलेल्या पोलच्या तळाशी केलेल्या काँक्रीटमध्ये तडे गेलेले दिसून येत आहेत. काँक्रीटला आवश्यक त्या प्रमाणात पाणी दिल्याचेही आढळत नसल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकारामुळे भविष्यात हे पोल सुरक्षित राहतील का, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ या कामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम दुरुस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी जोर धरत आहे.




