ताज्या बातम्या

जिंती येथील श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रा अलोट भाविकांच्या गर्दीत उत्साहात संपन्न

कराड (अमोल पाटील) : कराड तालुक्यातील जिंती येथे श्री ज्योतिर्लिंग देवाची पारंपरिक यात्रा यंदा दि. १ व २ एप्रिल रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि अलोट भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचा संगम या यात्रेत पाहायला मिळाला.
यात्रेची सुरुवात दि. १ एप्रिल रोजी सकाळी भाविकांनी दंडस्थान घेऊन पारंपरिक पद्धतीने केली. या विधीद्वारे भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त करत परंपरेचे जतन केले. त्यानंतर ‘जिंती प्रीमियर लीग’च्या माध्यमातून रंगलेल्या क्रिकेट सामन्यांनी युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
सायंकाळी ५ वाजता यात्रेनिमित्त ‘झुंजार आवाज’ या वर्तमानपत्राच्या विशेषांकाचे अनावरण करण्यात आले. या विशेषांकाचे संपादन श्री. अमोल पाटील यांनी केले असून, त्यामध्ये गावाची परंपरा, ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यानंतर रात्री १० वाजता हास्यविनोद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. संभाजीराव कदम यांच्या “हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा” या कार्यक्रमाने उपस्थित ग्रामस्थांना खळखळून हसवले आणि वातावरण आनंदमय केले.
दि. २ एप्रिल रोजी सकाळी ‘छबिना’ मिरवणूक बँजोच्या गजरात पार पडली. “जोतिबाच्या नावानं चांगभलं” या जयघोषांनी जिंती परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी नाचत-गात भक्तिभावाने सहभाग नोंदवला.
सायंकाळी जिंती गावाची ओळख असलेल्या कुस्ती मैदानात लहान व मोठ्या गटातील मल्लांमध्ये चुरशीच्या कुस्त्या रंगल्या. या कुस्त्यांना प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक खेळाला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला.
त्यानंतर सायंकाळी लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे विशेषतः युवक वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आणि सांस्कृतिक मनोरंजनाची मेजवानी लाभली.
या सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन जिंतीकर बांधवांनी केले होते. शिस्तबद्ध आयोजन, भाविकांची सोय आणि विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे या यात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Scroll to Top