भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर; घोगाव शाळेचा राज्यभर झळकला यशाचा झेंडा
भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगावने यंदाही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत राज्यभरात आपली छाप उमटवली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणवत्तेमुळे शाळेचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उजळले आहे.
राज्य गुणवत्ता यादीत ज्ञानेश्वरी डुंबरे आणि सार्थक प्रवीण पाटील यांनी प्रत्येकी 284 गुण मिळवत राज्यात सातवा क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेचा लौकिक अधिक वाढला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत सिद्धा माने हिने 272 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला, तर प्रियंश थावरे (268) याने तृतीय क्रमांक पटकावला. विभावरी आमने आणि शौर्य थोरात (262) यांनी सहावा, आदिराज भावके (260) सातवा, राजवंश शिंदे (258) आठवा, देवराज थोरात (256) नववा क्रमांक मिळवला. अंशुमन पाटील आणि आदिती शिनगारे (252) यांनी अकरावा, स्वराली करांडे (248) तेरावा, तर शिवराज यादव (242) सोळावा क्रमांक पटकावला.
केंद्र गुणवत्ता यादीत सृष्टी सूर्यवंशी (236) हिने प्रथम क्रमांक मिळवला असून स्वरा माने (220) हिने चतुर्थ क्रमांक मिळवून शाळेचा मान वाढवला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



