ताज्या बातम्या

धारावीमध्ये ज्योतिबाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न; भाविकांची प्रचंड गर्दी

मुंबई, दि. २ — दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलदैवत ज्योतिबाच्या पालखी सोहळ्याला धारावीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात होऊन समारोप झाला. कोल्हापूरच्या डोंगरावर जाऊन दर्शन घेणे शक्य नसलेल्या मुंबईतील भाविकांसाठी धारावीतील नारायण बावडी येथील ज्योतिबा मंदिरातून दरवर्षी हा पालखी सोहळा आयोजित केला जातो.

यावेळी भाविकांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “जोतिबाच्या नावानं चांगभलं” च्या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत वातावरण भक्तिमय झाले होते. कल्याण, डोंबिवली, बोरीवली, विरार, लालबाग, परळ आदी मुंबईतील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे सोहळा शांततेत पार पडला.
या सोहळ्यास धारावी विभाग संघटक विठ्ठल पवार, विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, नगरसेवक जोसेफ कोळी, शाखाप्रमुख किरण काळे, सतीश कटके, माजी आमदार बाबुराव माने, सुरेश सावंत तसेच नगरसेविका सौ. आशा दीपक काळे,मनसेचे कौशिक कोळी,समीर भोईटे,संदीप कदम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, धारावीतील विविध मंडळांनी भाविकांसाठी पाणी, शीतपेये, अल्पोहर वाटप आणि प्रसादाचे वाटप केले. हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला यांच्या वतीने गणेश खाडे यांनी परंपरेप्रमाणे लापशी वाटप करून सोहळ्याची रंगत अधिक वाढवली.
Scroll to Top