मुंबई : तमाशा या पारंपरिक लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलाकारांवर झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमाशा कलावंत नितीन बनसोडे यांचे मामे भाऊ मोहित नारायणगावकर गेल्या चार-पाच वर्षांपासून स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या परंपरेतील तमाशा पुन्हा उभा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
मात्र, काल काही समाजकंटकांनी तमाशा फडाच्या गाडीला अडवून कलाकारांवर हल्ला केला. या घटनेत महिला कलावंतांनाही मारहाण करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. ही घटना केवळ एका फडावरचा हल्ला नसून संपूर्ण लोककलेवरच आघात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
तमाशा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मंगला बनसोडे यांसारख्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कलाकारांनी आणि रघुवीर खेडकर यांसारख्या पद्मश्री सन्मानित कलाकारांनी या कलेचा वारसा जपला आहे. तरीही आजही कलाकारांना अपमान आणि हिंसेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
नितीन बनसोडे यांचे आवाहन
“मायबाप प्रेक्षकहो,
आपणच आमचे आधार आणि अन्नदाता आहात. आपल्या प्रेमावरच ही लोककला जिवंत आहे.
तमाशा ही फक्त करमणूक नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे.
कृपया अशा घटना पुन्हा घडू देऊ नका.
ही कला आपली आहे, हे कलाकार आपलेच आहेत.
चला, आपण सगळे मिळून या लोककलेचे रक्षण करूया, तिचा सन्मान राखूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी हा अमूल्य वारसा जिवंत ठेवूया.”
या घटनेमुळे तमाशा कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




