मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख याचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
या भव्य ऐतिहासिक सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. टीझरमध्ये हिंदवी स्वराज्य, युद्धनीती आणि महाराजांच्या पराक्रमाची झलक पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि विद्या बालन, यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज झळकणार आहे. तसेच जिनिलीया देशमुख या सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाला संगीत दिग्दर्शक जोडी अजय–अतुल यांचे संगीत लाभले असून, टीझरमधील पार्श्वसंगीत विशेष लक्ष वेधून घेत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी संपूर्ण देशभरात तब्बल ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा नसून, स्वराज्य, शौर्य आणि प्रेरणादायी वारशाचा भव्य सिनेमॅटिक अनुभव देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




