ताज्या बातम्या

धारावीत गुरुवारी २ एप्रिलला ज्योतिबाची यात्रा; ‘चांगभल’च्या जयघोषात भक्तिमय जल्लोष

मुंबई, दि. १ — महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या ज्योतिबा यांच्या यात्रेनिमित्त गुरुवारी २ एप्रिलला धारावी परिसरात भक्तिमय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरजवळील रत्नागिरी डोंगरावर होणाऱ्या पारंपरिक यात्रेसोबतच मुंबईतील धारावीतही “ज्योतिबाच्या नावानं चांगभल” अशा जयघोषात गुलाल व खोबऱ्याची उधळण करत भव्य यात्रा साजरी होणार असल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे नेते तथा माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली.
धारावी क्रॉस रोड येथील शिवनारायण बावडी परिसरात ब्रिटिशकालीन ज्योतिबाचे जागृत मंदिर असून, येथे पहाटे काकड आरती, दुग्धाभिषेक, होमहवन आणि इतर पूजाविधी पार पडणार आहेत. त्यानंतर सकाळी सुमारे ११.३० वाजता ज्योतिबाची रासनकाठी पालखी “चांगभल”च्या जयघोषात मार्गस्थ होईल. गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरात ही पालखी भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात संपूर्ण परिसरात फिरणार आहे. ही यात्रा सकाळपासून सुरू होऊन रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव तसेच कर्नाटकातील अनेक भाविक मुंबईत वास्तव्यास असल्याने त्यांना रत्नागिरी येथे जाता येत नाही. त्यामुळे पनवेल, कल्याण, वसई-विरार, लालबाग, भायखळा आदी भागांतून हजारो भाविक धारावीत येऊन ज्योतिबाचे दर्शन घेणार असल्याची माहिती शिवसेना समन्वयक सुरेश सावंत यांनी दिली.
या यात्रेत अनिल देसाई, महेश सावंत, बाबुराव माने, विठ्ठल पवार, वसंत नकाशे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून, हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
सासनकाठीचे आकर्षण ठरणार केंद्रबिंदू
धारावीतील ज्योतिबा यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘सासनकाठी’. भक्त मोठ्या उत्साहात ही काठी नाचवत यात्रेत सहभागी होतात. दुपारी ४ वाजता ही सासनकाठी शिवनारायण बावडी येथील मंदिरातून निघून धारावी क्रॉस रोड, शिवराज मैदान, कोळीवाडा, मुकुंद नगर मार्गे सायंकाळी ७.३० वाजता काळा किल्ला येथे पोहोचेल. त्यानंतर पुन्हा जल्लोषात ती मंदिरात परत येईल, असेही बाबुराव माने यांनी सांगितले.

Scroll to Top