ताज्या बातम्या

कंत्राटदाराने रखडवलेल्या कामाबद्दल आमदार संतापले ; संजय उपाध्याय यांनी धरले धारेवर

मुंबई : बोरीवली पूर्व येथील राजेंद्रनगर शारदा सहनिवास गृहनिर्माण संस्था ते पत्रकार सदन, ॐकारेश्वर, सिद्धिविनायक, कुलदीप सोसायटीसमोरील गटार आणि रस्त्यांची रखडलेली कामे आणि कंत्राटदाराने केलेले दुर्लक्ष यांची पाहणी करण्यासाठी स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी राजेंद्रनगरला भेट दिली. बोरीवली पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांना जोडणाऱ्या जनरल करिअप्पा उड्डाण पुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत हा पूल जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम सुरू आहे परंतु हे पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. यात अनेक अडचणी येतात तसेच मोठ्या प्रमाणावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. या संदर्भात सुद्धा नागरिकांनी आमदार संजय उपाध्याय यांच्या कानावर घातले. आमदार उपाध्याय यांनी कंत्राटदाराने रखडवलेल्या कामाबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. इतकेच नव्हे तर संजय उपाध्याय यांनी कंत्राटदाराला सर्व नागरिकांसमोर धारेवर धरीत त्याची खरडपट्टी काढली. यावेळी नागरिकांनी आपापली गाऱ्हाणी, अनंत अडचणी, समस्या आमदारांच्या कानावर घातल्या. स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना त्यांनी कंत्राटदाराच्या मुकादमाला धारेवर धरले. योग्य ती समज दिल्यानंतर हे काम युद्धपातळीवर सुरू करून स्थानिकांना लवकरात लवकर रस्ता खुला करून द्यावा, जेणेकरून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, ऑफिस किंवा कार्यालयात जाणाऱ्यांना आणि वाहनचालकांना दिलासा मिळेल, असेही आमदारांनी निदर्शनास आणले.

या वेळी राजेंद्रनगरमधील स्थानिक नागरिक आणि अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ, असे कंत्राटदारातर्फे समीर म्हात्रे यांनी सांगितले.

Scroll to Top