ताज्या बातम्या

माजी खासदार राहुल शेवाळे बॉक्सिंगच्या रिंगणात; महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई : बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, माजी खासदार राहुल शेवाळे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात 1 मार्च रोजी पार पडलेल्या निवडणुकीत राज्यभरातील 25 संघटनांच्या एकूण 50 प्रतिनिधींनी एकमताने शेवाळे यांच्यासह एकूण 13 पदाधिकाऱ्यांना बिनविरोध निवडून दिले होते. कायदेशीर बाबींची पूर्तता करून नियमानुसार, नुकतीच बीएफआयने या संघटनेला मान्यता दिली. या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रणजीत सावरकर, सचिव पदी डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष पदी मिलन वैद्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे.तसेच अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाळ देवांग आणि ओलंपियन मनोज पिंगळे यांचा देखील कार्यकारणीत समावेश आहे.

राज्यभरातील एकूण 25 जिल्हास्तरीय बॉक्सिंग संघटनांची शिखर संस्था म्हणून बीएफआयशी समन्वय साधण्याची आणि राज्यभरातील बॉक्सिंगपटूंना हक्काचे व्यासपीठ देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या जुन्या कार्यकारिणीची मुदत 2022 मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर काही कारणास्तव 2025 पर्यंत असोसिएशनची निवडणूक झालीच नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत,नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीला बीएफआयने अवैध ठरवले होते. त्यानंतर राज्यभरातील 25 जिल्हास्तरीय संघटनांच्या सहकार्याने कंपनी ऍक्टच्या कलम 8 अंतर्गत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची नोंदणी करण्यात आली आणि निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. बीएफआयचे नरेंद्रकुमार निरवाणा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण 13 पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित 2 जागांसाठी (1 पुरुष खेळाडू आणि 1 महिला खेळाडू) येत्या काळात निवडणूक घेतली जाणार आहे.

*कोट-1*
“राज्यभरातील संघटनांच्या प्रतिनिधींनी माझ्यासह संपूर्ण कार्यकारिणीवर दाखविलेल्या विश्वासबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्यभरातील बॉक्सिंगपटूंना आवश्यक त्या सुविधा देऊन अव्वल खेळाडू घडविण्यासाठी बीएफआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू”
– राहुल रमेश शेवाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन

*कोट-2*
“सुमारे 1925 पासून भारतात खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रामध्ये आजवर अनेक अव्वल बॉक्सिंगपटू घडले. पद्मश्री पुरस्कारासह मेजर ध्यानचंद, अर्जुन, दादाजी कोंडदेव असे अनेक मानाचे पुरस्कार महाराष्ट्रातील बॉक्सिंगपटूंनी पटकावले आहेत. भविष्यात, या क्रीडा प्रकारात भारताची कामगिरी उंचावण्यासाठी आमच्या कार्यकारणीतील अनुभवी पदाधिकारी आणि खेळाडूंच्या साथीने आम्ही प्रयत्न करू”
– रणजीत सावरकर, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन कार्यकारिणी
अध्यक्ष
श्री. राहुल शेवाळे, माजी खासदार ( मुंबई ), उपाध्यक्ष
1) श्री. रणजित सावरकर, वरिष्ठ उपाध्यक्ष( ठाणे )
2) कॅप्टन गोपाल देवांग ( अर्जुन अवार्डी, पुणे)
3) श्री. अरुण बुटे ( राष्ट्रीय बॉक्सर, माजी बॉक्सिंग क्रिडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी, नागपूर ) 4) कु. सविता बावनथडे ( अमरावती, माजी बॉक्सर ), सचिव श्री. राकेश तिवारी ( राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी BFI , चंद्रपूर ),सहसचिव
1) श्री. मनोज पिंगळे ( ऑलम्पिअन, अर्जुन अवार्डी पुणे ) 2) श्री. योगेश मुंदडा ( क्रिडा संघटक, सातारा )
3) श्री. धनंजय बनसोडे ( आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक परभणी ) 4) सौ. निलम पाटील ( राष्ट्रीय पंचाधिकारी, पालघर ), कोषाध्यक्ष श्री मिलन वैद्य ( राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आणि माजी बॉक्सर , ठाणे ), सदस्य
1) कु. साक्षी गायधनी ( आंतरराष्ट्रीय बॉक्सर नासिक )
2) श्री.विशाल खंडारे ( क्रिडा संघटक बॉक्सिंग बुलढाणा ) तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल त्रिवेदी ( मुंबई ) यांची निवड करण्यात आली आहे.

Scroll to Top