ताज्या बातम्या

कराड स्टँड परिसरातील अतिक्रमणांवर नगरपालिका कारवाई; नागरिकांकडून समाधान

कराड(प्रताप भणगे) : कराड नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत टपऱ्या तसेच इतर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः कराड स्टँड परिसरासह मुख्य रस्ते आणि विविध पेठांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या कारवाईत नगरपालिका प्रशासनासोबत पोलीस प्रशासनानेही सक्रिय सहभाग घेतला असून अतिक्रमणे शांततेत काढण्याचे काम सुरू आहे. दीर्घकाळापासून रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती.
दरम्यान, ही कारवाई सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासनाने ही मोहीम पुढेही सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Scroll to Top