ताज्या बातम्या

कराड तालुक्यातील जिंती येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस २ एप्रिल

कराड (अमोल पाटील) : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील जिंती येथे श्री ज्योतिर्लिंग देवाची पारंपरिक यात्रा यंदा दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, मुख्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर गावात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त दिनांक १ एप्रिल रोजी सायंकाळी ८.३० वाजता संभाजी यादव यांचा “हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा” हा हास्यविनोद कार्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य दिवशी पहाटेपासून पूजा-अर्चा, अभिषेक, आरती तसेच भाविकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच पारंपरिक पालखी मिरवणूक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

यात्रेसाठी परिसरासह इतर भागांतून हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थ व आयोजक समितीकडून पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, सुरक्षा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, यात्रेनिमित्त सायंकाळी ३.०० वाजता जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन कुस्ती कमिटी, पैलवान ग्रुप व ग्रामस्थ मंडळ जिंती यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण “कुस्ती हेच जीवन” या YouTube चॅनेलवर करण्यात येणार आहे.

जिंतीची ही यात्रा धार्मिक परंपरा, संस्कृती व ग्रामएकतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे यात्रेच्या मुख्य दिवशी श्री ज्योतिर्लिंग देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Scroll to Top