
नवी मुंबई — मनोरंजन विश्वात नवा अध्याय लिहिण्याच्या उद्देशाने प्रथमेश कलामंच प्रस्तुत आणि निर्माते साहेबराव गोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला “इश्काची बिजली कडाडली” हा भव्य लावणी कार्यक्रम आज विष्णुदास भावे नाट्यगृह,नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला. पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत कार्यक्रम हाऊसफुल ठरला.
या रंगतदार कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने रंगमंच गाजवला. त्यांच्या सोबत आकांक्षा कदम, कविता घडशी, विद्या सदाफुले यांसारख्या नामांकित कलाकारांनी एकापेक्षा एक सरस लावण्या सादर करत उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्राची परंपरागत ओळख असलेली पेशवाईकालीन लावणी आजही तितक्याच दिमाखात जपली जात असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. निर्माते साहेबराव गोळे यांनी लावणी कला सातासमुद्रापार पोहोचवण्याचा ध्यास घेतला असून, त्याचा भव्य शुभारंभ या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुशील कुमार यांनी केले. पार्श्वगायिका, वादक आणि संपूर्ण तांत्रिक टीमनेही दमदार साथ देत कार्यक्रमाला चार चाँद लावले. प्रत्येक सादरीकरणाला रसिकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
या शोला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे येणाऱ्या काळात जिओ आर्ट्स सेंटर, षण्मुखानंद सभागृह यांसारख्या प्रतिष्ठित रंगमंचांवर तसेच देश-विदेशातही या कार्यक्रमाचे प्रयोग होणार असल्याची माहिती निर्माते साहेबराव गोळे यांनी दिली.
“इश्काची बिजली कडाडली” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या डोक्यावर घेतला गेला असून, भविष्यातील सर्व प्रयोग हाऊसफुल होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




