सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र शासनाच्या दीडशे दिवस कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य केले . यासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरता दीडशे दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मूल्यांकन करून गुणांकन करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेने शंभर टक्के गुण मिळवले आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा गौरव करण्यात आला. एक कर्तबगार महिला अधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सातारा जिल्ह्यामध्ये बहर आली आहे. स्मार्ट पी एस सी व स्मार्ट शाळा करण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
या गौरव सोहळ्याच्या वेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थिती होती
सुरुवातीस हा कार्यक्रम दिनांक ६ मे २०२५ ते महात्मा गांधी जयंती दिनांक २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये घोषित करण्यात आला होता. तथापि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे सदर दीडशे दिवसाच्या कार्यक्रमास १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे मूल्यमापन करून सेवा कर्मी कार्यक्रमांचे गुणांकन करण्यात आले. या गुणांकनामध्ये सातारा जिल्हा परिषदेस ८० पैकी ८० असे शंभर टक्के गुण मिळाले आहेत. सदर सेवा कर्मी कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या पदोन्नतीने नियुक्ती देणे, सरळ सेवा नियुक्ती देणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या बिंदू नामावल्या प्रमाणीकरण करून घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा नियुक्ती करणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सदर पोर्टल वरील पाच प्रशिक्षणे पूर्ण करणे व सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे या बाबींचा समावेश होता.
या सर्व बाबींमध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट कामकाज केल्यामुळे सदर बाबींच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून सातारा जिल्हा परिषदेने सर्वोत्कृष्ट कामकाज केले आहे.
चौकट —–
सदरच्या सन्मानाबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगून हा पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमूख, सर्व पंचायत समितींचे गट विकास अधिकारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. याचप्रमाणे भविष्यात देखील अशा सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्हा परिषद शासनामार्फत राबविणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवेल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
_______________________________
फोटो– सातारा जि प सिओ श्रीमती नागराजन यांचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस मंत्री शेलार व वरिष्ठ अधिकारी अगरवाल (छाया– निनाद जगताप, मुंबई)




