ताज्या बातम्या

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; प्रशासनाचे आवाहन – साठा पुरेसा, घाबरू नका

कराड : देशभरात पेट्रोल टंचाईबाबत अफवा पसरल्याने अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान आणि हैदराबाद येथे उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही, अशा चुकीच्या संदेशांमुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
या अफवांचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला असून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मौजे घोगाव येथे पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागल्या. काही ठिकाणी गर्दी अनियंत्रित झाल्याने किरकोळ हाणामारीचे प्रकारही घडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोलचा साठा मुबलक असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. घाबरून अनावश्यक साठा करण्याची गरज नसून सर्वांना नियमितपणे इंधन उपलब्ध राहील, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to Top