कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : कराड शहरामध्ये सोमवार दि 23 रोजी मध्यरात्री भीषण थरार उडाला, एका भरधाव ओम्नी गाडीने अक्षरशः मृत्यूचा खेळ मांडत कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका मार्गे कन्याशाळा परिसरापर्यंत धडक देत अपघातांची मालिकाच घडवली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेफाम वेगात असलेल्या ओमनी गाडीने रस्त्यात येणाऱ्या 4 जणांना जोरदार धडक देत हवेत फेकले. या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून जखमींमध्ये एका माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत पोलिसांनी ओम्नी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी हो होत आहे.




