ताज्या बातम्या

समाजभूषण राजू झनके; विचार, संघर्ष आणि समाजसेवेचा अखंड प्रवास..

आजकाल एखाद्याचं मुल्यमापन पाहूनच मार्गदर्शन, सहकार्य आणि कौतुक केले जाते. मात्र खरे नेतृत्व असे असते की जे सर्वांना सोबत घेऊन चालते आणि आपल्या सहकाऱ्यांना कधीही कमी लेखत नाही किंवा गृहित धरत नाही. अशा सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपणारे सर्वसमावेशक, एक बंडखोर, प्रेरणादायी व्यक्तीमत्व, जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, समाजभूषण राजू किसन झणके. ते कर्तृत्वानेच नव्हे तर स्वभावाने, मनानेही श्रेष्ठ आहेत. अशी माणसं आपला मोठेपणा दिखाऊपणातून नव्हे, तर वागण्यातून, कृतीतून आणि समाजासाठी केलेल्या कार्यातून सिद्ध करत असतात.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत सन २०२४ मध्ये त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. मात्र, या सन्मानाचा गौरव स्वतःकडे न ठेवता त्यांनी तो चळवळीतील कार्यकर्त्यांना समर्पित केला आणि चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करुन आपल्या विचारनिष्ठतेची प्रचिती दिली.

२१ मार्च १९६९ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग होता. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमीहीन आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे सामाजिक संघर्षाचे बाळकडू राजू झनके यांना घरातूनच मिळाले. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी चळवळीत प्रवेश केला. प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपला मार्ग तयार केला. उपजीविकेसाठी अनेक नोकऱ्या केल्या, मात्र चळवळीतील सक्रिय सहभागामुळे त्यांना एकही नोकरी टिकवता आली नाही. तरीही त्यांनी हार न मानता पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरोधात लढा उभारला. अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांच्या सौजन्यशील स्वभावामुळे आणि समन्वय साधण्याच्या वृत्तीमुळे चळवळीत त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली. सामाजिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तसेच सर्वसामान्य जनतेशीही त्यांनी तितकाच सलोखा राखला आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रकरण, पनवेलमधील स्वप्निल सोनावणे हत्याकांड, तळेगाव दाभाडे येथील डॉ. आंबेडकरांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवणे, नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण अशा अनेक संवेदनशील विषयांवर त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही राजू झणके यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ‘महामानव प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमाद्वारे गेल्या काही वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य वितरीत केले. त्यांच्या या शैक्षणिक सेवाभावी उपक्रमाची राज्य पातळीवर सर्वत्र दखल घेण्यात आली आहे.

राजू झणके हे गेली २३ वर्षांपासून विविध दैनिकांमध्ये पत्रकारिता करत असून, मंत्रालय आणि विधीमंडळाचे वार्तांकन करत त्यांनी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.
समाजातील अन्यायग्रस्तांसाठी धावून जाणारा, संकटसमयी आधार देणारा आणि संविधानिक मार्गाने लढा देणारा असा त्यांचा सर्वसमावेशक स्वभाव आहे. त्यामुळेच ते उपेक्षित व वंचित घटकांसाठी नेहमीच मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ठरले आहेत.

आपला जन्म दिवस साजरा करतांनाही त्यांनी नेहमीच समाजभान जपली आहे. कुर्ला येथील संत गाडगे महाराज वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांनी आदर्श निर्माण केला. अशा या ध्येयवादी, प्रेरणादायी आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्वाला ५६ व्या जन्म दिवसानिमित्त त्यांना पुढील आयुष्यात अधिक यश, उत्तम निरोगी दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, ह्याच मंगलमय सदिच्छा !

– मिलिंद कांबळे, चिंचवलकर

Scroll to Top