मुंबई : बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण संपणार नाही. अशोक खरात प्रकरणात काही मंत्री व अधिकारी यांची नावे समोर आली आहेत. अशोक खरात या विकृताला वाचवण्यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्या सर्वांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांना अनेक महिला बळी पडल्या आहेत, त्यांचे लैंगिक व आर्थिक शोषण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे तरिही अशोक खरात सारखे भोंदूबाबा राजकीय व्यक्तींच्या पाठिंब्याने राजरोस मंत्रतंत्र च्या माध्यमातून महिला व जनतेची फसवणूक करतात हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर, महापुरुष, समाजसुधारक व संतांच्या पुरोगामी राज्यात खरात सारख्या विकृती फोफावल्या हे चिंताजनक व गंभीर आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीही अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठे योगदान दिले आहे हे विसरून चालणार नाही. सरकारने एसआयटी मार्फत चौकशी सुरु केली आहे पण मंत्रिमंडळातील जे मंत्री अशोक खरातची दिक्षा घेऊन तंत्र मंत्र करतात व अशोक खरातच्या कारमान्यात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली तरच पीडित महिलांना न्याय मिळेल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महिलांना न्याय देणे हे महिला आयोगाचे कामच आहे पण रुपाली चाकणकर यांचे काम पाहता राज्य महिला आयोगाच्या अकार्यक्षम अध्यक्षा म्हणूनच त्या लक्षात राहतील, त्यांनी महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिलांना जास्त अडचणीत आणले आहे. बलात्कारी अशोक खरात प्रकरणी देखील शेवटपर्यंत आपला काहीच संबंध नाही हे दाखवण्याचा आटापिटा रुपाली चाकणकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. अशोक खरात सारख्या विकृती महाराष्ट्रात पुन्हा फोफावणार नाहीत असा धडा शिकवला पाहिजे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.




