मुंबई : बेडर, बेरड आणि रामोशी समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाणारी राज्यव्यापी नोकरदार परिषद येत्या 29 मार्च 2026 रोजी राजधानी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिशा ठरविण्याचा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
इतिहास पाहता शौर्य, धाडस, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यासाठी ओळखला जाणारा हा समाज हिंदवी स्वराज्यातील गुप्तहेर प्रमुख राजे बहिर्जी नाईक, आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक आणि शिवभक्त बेडर कन्नप्पा यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा जपणारा आहे. देशरक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी या समाजातील वीरांनी मोठ्या प्रमाणात बलिदान दिले, मात्र आजही समाज मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर समाजाला 21व्या शतकात प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. याआधी लोणंद (सातारा), तासगाव (सांगली), उमरगा (धाराशीव) आणि श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे जिल्हास्तरीय बैठका घेऊन समाज बांधवांमध्ये संवाद आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यात आली आहे. या उपक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ समाज विकास हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
परिषदेची प्रमुख उद्दिष्टे :
समाजात शैक्षणिक चळवळ उभी करणे
युवकांना नोकरी, व्यवसाय व उद्योग मार्गदर्शन देणे
गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार
समाजाचा इतिहास, संस्कृती आणि भाषा यांचे जतन व प्रसार
विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणे
जनगणना व समस्यांवर कृती आराखडा तयार करणे
अंधश्रद्धा व व्यसनाधीनता निर्मूलनासाठी प्रयत्न
स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) तयारीसाठी मदत केंद्र उभारणे
कार्यक्रम स्थळ :
मराठी ग्रंथसंग्रहालय, अग्निशमन दलाशेजारी, जुने शारदा टॉकीज जवळ, दादर (पूर्व), मुंबई – 400014
समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचे दर्शन घडवावे, तसेच आपले विचार मांडून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




