सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला ३० मार्च २०२६ रोजी असलेला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून एक अभ्यासू, मनमिळावू आणि धडाडीचे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच जबर धक्का बसला असून या दुःखातून सावरणे कठीण आहे.
“अजितदादा हे केवळ माझे मित्रबंधू नव्हते, तर ते माझे मार्गदर्शक होते. माझ्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सहकार्यामुळे सातारा-जावली मतदारसंघासह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली,” असे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या भावनांचा विचार करून आपण यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यकर्ते व नागरिकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, फ्लेक्स, बॅनर लावू नयेत, तसेच हार, बुके किंवा भेटवस्तू देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.




