सातारा(अजित जगताप ) : सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फलटण व जावळीत दगा फटका झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. या दोन्ही तालुक्याचा सातारा जिल्हा परिषद निवडी मध्ये सन्मान राखण्यासाठी सेना नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जावळी तालुक्यातील शिवसेना जि. प. सदस्य सौ कविता एकनाथ ओंबळे यांना सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष किंवा महिला बालकल्याण समिती सभापती देऊन जावळीकरांचा राग शांत करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे निश्चित मानण्यात येत आहे.
जावळी तालुक्यामध्ये पंचायत समिती सभापती निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी एकमेव सदस्य तटस्थ राहिलेले भाजपचे कमळ फुलले आहे. तुतारी वाजवून कमळ फुलवल्यामुळे म्हसवे गटातील राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादीचा अस्त झाला असला तरी भाजपला रोखण्यासाठी शिवसेना धनुष्यबाण घेऊन सज्ज झाले आहे. जावळी तालुक्यामध्ये सातारा जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत नवसाला पावणाऱ्या श्री काळुबाईं देवीच्या कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे निष्ठावंत व संपर्कप्रमुख एकनाथजी ओंबळे यांच्या पत्नी शिवसेनेच्या सौ कविता एकनाथ ओंबळे या १८० मताधिक्य घेऊन विजयी
झाल्या. सौ. कविता एकनाथ ओंबळे (शिवसेना) ८९५१, सौ.अर्चना ज्ञानदेव रांजणे (भाजपा) ८७७१,सौ.कल्पना गणपत पार्टी (अपक्ष) १२८ नोटा१०५. कुसुंबी गणात भाजपाच्या सौ. पुष्पा चिकणे यांचा सौ. सुनीता दुंदळे यांनी ४८२ मतांनी पराभव केला. पुष्पा जगन्नाथ चिकणे (भाजपा) ३३६७, सुनिता विलास दुंदळे शिवसेना ४२४९ अशी मते मिळाली.
आंबेघर तर्फ मेढा गणात अतिश कदम यांनी
भाजपच्या विजय सपकाळ यांचा ७२२
मतांनी पराभव केला. अतिश संतोष कदम
शिवसेना ५१७५ विजय बाबाजी सपकाळ
भाजपा ४४५३ अशी मते मिळाली. या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जावळी पंचायत समिती सभापती, सभापती निवडीमध्ये सुद्धा शिवसेना- राष्ट्रवादी बाजी मारणार असे वाटले असतानाच तटस्थ राजकारणामुळे स्वतःच्या पायावर राष्ट्रवादीने धोंडा मारून घेतला आहे.
शिवसेना नेत्यांनी सातारा शासकीय विश्राम येथे झालेल्या पत्रकार परिषदा घेऊन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत उत्तर द्यावे. अशी मागणी करून त्यांना निरुत्तर केले आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्हा पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्यासह त्याचे सर्व नूतन सदस्यांनी जावळीकरांना उपाध्यक्ष किंवा सभापती पद द्यावे असे थेट मागणी करून एकाच दगडात भाजप, राष्ट्रवादी व जावळीतील शिवसेना वगळून इतर नेत्यांची हंडी फोडण्याचे काम केले आहे. त्याचीही चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे.
जावळी तालुक्यातील म्हसवे गटात शिवसेनेचे संदीप पवार यांचा पराभव भाजपने केला नसून राष्ट्रवादीने हा पराभव केल्याचे जावळी पंचायत समिती सभापती निवडीने सिद्ध झाल्याची आता शिवसैनिक उघडपणाने बोलू लागले आहेत. या ठिकाणी एकाच एक लढत असताना भाजपला राष्ट्रवादीने रसद पुरवली. परंतु प्रचार यंत्रणेमध्ये त्याचा साधा अंश सुद्धा दाखवला नाही. एकदम भगदाड पाडले. अशी आता राजकीय चर्चा होताना दिसत आहे.
समाज माध्यमावरही मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. सर्व घडामोडी मध्ये बारकाईने लक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांनी जावळी मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण उभा करण्यासाठी शिवसेनेच्या जि प सदस्य सौ कविता एकनाथ ओंबळे यांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्या अर्थाने राष्ट्रवादीने टाकलेल्या जाळ्यात राष्ट्रवादीचाच नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीकडे २० आणि शिवसेनेकडे १५ असे एकूण३५ सदस्य आहेत भाजपकडे २७ सदस्य असून अध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीच्या औंध गटातील मनीषा फडतरे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे फलटण किंवा कराड , पाटण मध्ये संधी मिळणार आहे असे राष्ट्रवादी शिवसेनेने एकत्रितरित्या विचार विनिमय केला आहे. असे एका सामान्य कार्यकर्त्यांनी विश्वासाने सांगितले.
शेवटी वरिष्ठ नेत्यांपेक्षाही सामान्य कार्यकर्त्यांना व्यक्त केलेला राजकीय अंदाज खरा ठरलेला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन आले आहे शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेने भगवा फेटा बांधूनच प्रवेश करण्याचे निश्चित केल्यामुळे अध्यक्ष पदही निश्चित मानले जात आहे. या सर्व घडामोडी मध्ये राष्ट्रवादीचे नेते व मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे उपनेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह स्थानिक नेत्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
___________________________________ फोटो— सातारा जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापतीचे दावेदार सौ कविता एकनाथ ओंबळे




