ताज्या बातम्या

अधिकारी बंधूंची सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व महिलांना साडी वाटप

कोल्हापूर : कै. जिजाबाई निवृत्ती वाघमोडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत डोंगर-दऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील कळमतळी व अंबाईवाडा येथे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर ११५ महिलांना साडीचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास विविध मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सांगितले की, उल्हासराव वाघमोडे (भूमी अभिलेख अधिकारी, मुंबई) आणि संजय वाघमोडे (उपवनसंरक्षक, कोल्हापूर) या दोन्ही अधिकारी बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनीही समाजासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
जिजाबाई वाघमोडे या नेहमीच कष्टाळू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या संस्कारांमुळेच कुटुंबातील सदस्य उच्च पदांवर कार्यरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
उल्हासराव व संजय वाघमोडे यांनी सांगितले की, “शिक्षणाशिवाय समाजाच्या प्रगतीचा पर्याय नाही. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे अनाठायी खर्च कमी करून आम्ही ५१ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. आईच्या स्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवला जाईल.”
या कार्यक्रमास मारुती झोरे, नामदेव लांबोर, विठ्ठल येडगे, विठ्ठल गावडे, सुशांत माळी, अर्जुन चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top