पनवेल– (अमोल पाटील) : आमटेम येथे रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, या मागणीबाबत रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर एका स्थानिक नागरिकाने पनवेल रेल्वे स्थानक परिसरात फलक हातात घेऊन आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “अनेक वर्षांपासून आमटेम येथे रेल्वे स्टेशन उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. त्यामुळे लवकरच ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आमटेम व परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला रोजच्या प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जवळपास रेल्वे स्थानक नसल्यामुळे नागरिकांना लांब अंतर कापून प्रवास करावा लागतो. परिणामी वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत असल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, आमटेम परिसरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता येथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे




