ताज्या बातम्या

उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ऑल इंडिया ५४५ वी रँक; चौथ्या प्रयत्नात यश

कराड(अमोल पाटील)’: उंडाळे (ता. कराड) येथील साईराज पंडितराव पाटील यांनी सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवत ऑल इंडिया ५४५ वी रँक मिळवली आहे. ग्रामीण भागातून मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून त्यांच्या या यशाबद्दल उंडाळे गावासह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साईराज पाटील यांचे वडील पंडितराव दिनकर पाटील हे सध्या पाटण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत, तर आई जयश्री पंडितराव पाटील या माध्यमिक शिक्षिका आहेत. साईराज यांच्या या यशाबद्दल त्यांच्याशी धगधगती मुंबई शी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगितला.
साईराज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण त्यांनी पुणे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसमध्ये नोकरीही केली. मात्र प्रशासनात जाऊन समाजासाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे २०२१ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीची तयारी सुरू केली.
चौथ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले. २०२४ व २०२५ या दोन्ही वर्षांत त्यांनी मेन्स परीक्षा दिली होती. यावर्षी त्यांना पहिल्यांदाच मुलाखतीसाठी कॉल आला आणि अखेरीस त्यांनी ऑल इंडिया ५४५ वी रँक मिळवत यश संपादन केले. त्यांनी आंतरपॉलॉजी हा ऑप्शनल विषय घेतला होता. या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी दिल्ली येथे कोचिंग घेतले होते.

या प्रवासात आई-वडिलांचा मोठा मानसिक आधार लाभल्याचेही त्यांनी सांगितले. आयआयटीमध्ये शिक्षण घेत असताना आईने आपल्या नोकरीतून रजा घेऊन त्यांना वेळ दिला, तर वडिलांनी सातत्याने मानसिक आधार दिला. त्यांच्या लहान बहिणीनेही त्यांना मोठा पाठिंबा दिला. त्यांची बहीण मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

यूपीएससी करण्याची प्रेरणा कशी मिळाली याबाबत बोलताना साईराज यांनी सांगितले की, त्यांच्या गावातील माजी जिल्हाधिकारी स्वर्गीय दिनकरराव पाटील हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत वडिलांचीही इच्छा होती की मुलाने यूपीएससीत यश मिळवावे. आज त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे.

पुढे आयपीएस सेवेत काम करण्याची इच्छा असल्याचे साईराज यांनी सांगितले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच समाजसेवेची आवड निर्माण झाली. प्रशासनात जाऊन सामान्य लोकांची कामे करावीत, अशी त्यांची भूमिका आहे. उंडाळे गावाने माझ्या वडिलांना घडवले आणि वडिलांनी मला घडवले. स्वर्गीय दिनकरराव पाटील (माजी जिल्हाधिकारी) आणि स्वर्गीय विलास काका पाटील (माजी मंत्री) यांच्या कार्याचा वारसा गावातून कुणीतरी पुढे नेला पाहिजे, ही वडिलांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, असेही त्यांनी सांगितले. तसेच उंडाळे गावातील त्यांच्या काकींचेही या यशामध्ये मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

साईराज यांच्या या यशाबद्दल रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, ऍड आनंदराव पाटील, ऍड विजयसिंह पाटील तसेच उंडाळे गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Scroll to Top