ताज्या बातम्या

लावणी थांबवून राजकीय भाषण; कलावंत आकांक्षा कदम यांचा अपमान? कलाकारांमध्ये संताप

मुंबई : महाराष्ट्राची पारंपरिक आणि अभिमानाची कला असलेली लावणी आजही अनेक कलाकार जपून ठेवत आहेत. अशाच प्रसिद्ध लावणी कलावंत आकांक्षा कदम यांच्या कार्यक्रमात घडलेल्या प्रकारामुळे कलावंतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कांदिवली (पूर्व) येथील हनुमान नगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आकांक्षा कदम यांचा लावणीचा शो आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विविध गीते आणि लावणीचे सादरीकरण सुरू असतानाच अचानक लावणी थांबवण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला.
आयोजकांनी “मॅडमना घाई आहे, त्यामुळे त्यांना आधी बोलू द्या” असे सांगत लावणी थांबवली. मात्र त्यानंतर शीतल म्हात्रे यांनी जवळपास १५ ते २० मिनिटे भाषण केले. या भाषणात त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारच्या लावण्या सादर केल्या जात नव्हत्या” असा उल्लेख केला.
या घटनेमुळे लावणी कलावंत आकांक्षा कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. कार्यक्रमात लावणीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत त्यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आकांक्षा कदम यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओद्वारे ही संपूर्ण व्यथा मांडली. “आम्ही कोणत्याही प्रकारचे अंगप्रदर्शन न करता तळपायापासून केसांपर्यंत संपूर्ण पोशाखात लावणी सादर करतो. तरीही आमच्या कलेला कमी लेखले जाते. पण दुसरीकडे काही कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील यांना नाचवले जाते, मग आम्ही लावणी कलावंत का चालत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणावर राज्यभरातील अनेक कलाकारांनी आकांक्षा कदम यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असून तिचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका कलाकारांनी घेतली आहे.
या घटनेबद्दल संबंधित आयोजक आणि शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी आकांक्षा कदम यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महाराष्ट्राच्या लोककलेबद्दल असलेला आदर आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये कलाकारांना मिळणारी वागणूक यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Scroll to Top