मुंबई (निलेश कोकमकर /शांताराम गुडेकर ): कळंबट (चिपळूण) गावातील सडेवाडीचे सुपुत्र तुषार कोकमकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्यात १६ वा क्रमांक प्राप्त करत PSI पदावर निवड झाली आहे. त्याबद्दल तुषार कोकमकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांच्या या यशामागे प्रेरणादायी भूमिका बजावणारे सत्यशोधक प्रवर्तक मा. कृष्णाजी कोकमकर गुरुजी आणि आई कल्याणी कोकमकर यांचेही मनापासून अभिनंदन व कौतुक होताना दिसत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेला, चिपळूण पासून जवळ जवळ ६० किलोमीटर असलेल्या कळंबट खेडेगावातील साध्या वातावरणात वाढलेला तुषार आज आपल्या जिद्द, मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर राज्यात मानाचे स्थान मिळवतो, ही बाब केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण कळंबट गावासाठी आणि पंचक्रोशीतील परिसरासाठी अभिमानास्पद आहे. मोठ्या शहरासारखी सुविधा, कोचिंग क्लासेस किंवा भरपूर साधनसामग्री नसतानाही ग्रामीण भागातून उभा राहून एवढे मोठे यश संपादन करणे म्हणजे खरोखरच प्रेरणादायी कर्तृत्व आहे.
या यशामागे तुषार कोकमकर यांच्या आई वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन आणि विचारांचे बळ मोठ्या प्रमाणावर आहे. सत्यशोधक विचारांचा वारसा जपणाऱ्या या कुटुंबाने शिक्षण, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना कायम जोपासली. त्या संस्कारांचीच ही उज्ज्वल फळे आज तुषारच्या यशातून दिसून येत आहेत.
तुषारचे हे यश आज ग्रामीण भागातील असंख्य तरुणांसाठी आशेचा किरण बनला आहे. परिस्थिती कशीही असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य ध्येय असेल तर यश नक्की मिळते, याचा तो जिवंत उदाहरण आहे. त्याच्या या कर्तृत्वामुळे अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळेल आणि गावागावातून नवे अधिकारी घडतील, अशी खात्री वाटते.
तुषार कोकमकर याला पुढील सेवेत उत्तम यश लाभो, तो प्रामाणिकपणे समाजाची सेवा करीत महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचावो आणि आपल्या कुटुंबाचा, गावाचा व समाजाचा अभिमान वाढवत राहो.




