तळमावले/वार्ताहर :’शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होत असून हे अभियान शनिवार दि.7 मार्च, 2026 रोजी ढेबेवाडी, कुठरे, तळमावले या ठिकाणी होत आहे. या अभियानातून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा असा प्रयत्न सुरु आहे. अभियानाची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनस्तरावर विविध क्लृप्त्या, युक्त्या राबवल्या जात आहेत. बातम्या, जाहिराती, प्रभात फेरी, मिटींग, बॅनर, सोशल मिडीया व अन्य बाबींतूनही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार अनंत गुरव व त्यांची संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्रांतूनही माहिती आता दिली जात आहे. पाटण तालुक्यातील सुप्रसिध्द चित्रकार संदीप डाकवे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्यंगचित्रे आणि त्याला साजेशी वाक्ये लोकांच्यामध्ये अभियानाविषयी जनजागृती आणि जाणीव निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांच्या या अभियानविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या अभियानातून आपल्या बहुतांशी समस्या सुटतील अशी आशा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबरच अन्य लोकांनी संदीप डाकवे यांच्या या अभियानाच्या प्रचार आणि प्रसिध्दी साठी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे कौतुक होत आहे.
या समाधान शिबीरात प्रलंबित फेरफार काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, लोकसेवा कायद्यानुसार सेवा, महसुल सुधारणाबाबत मार्गदर्शन, डिजिटल 7/12 जनजागृती, म.ज.न.संहिता 1966 मधील बदल इ.सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय पाटण, मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकरी व इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
चित्रांच्या रंगीबेरंगी दूनियेचे तसे सर्वांनाच आकर्षण. संदीपने रंगरेषांचा, शब्दांचा आधार घेत कुंचल्यातून साकारलेली अनेक चित्रे इतकी बोलकी वाटतात अगदी जिवंत असावी अशीच. अशा रंगरेषांच्या दुनियेतील आगळीवेगळी मैफल आपणही साकारावी असे प्रत्येकाला वाटणे तितकेच स्वाभाविक, मात्र सर्वांनाच ते शक्य नाही. चित्रांच्या नगरीत प्रत्येकाला थक्क करणारे तसे थोडेच. दुर्गम, डोंगराळ व मुलभुत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या डाकेवाडीतील संदीप राजाराम डाकवे हा युवा चित्रकार त्यापैकीच एक.
याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, अब्दुल कलाम, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह अनेकांची ‘सही रे सही’ शब्दचित्रे तयार केली आहेत. तर खडूतून अष्टविनायकाची कलाकृती, मोर पिसावर संत तुकाराम, पिंपळाच्या जाळीदार पानावर श्रीगणेश, सर्वात मोठी भित्तीपत्रिका, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश लिहून व्यसनमुक्ती करण्याचा प्रयत्न, जटानिर्मुलन, पत्रमैत्री, रांगोळी, व्यंगचित्र रेखाटने यासारखे विविध समाजोपयोगी छंद जोपासले आहेत. संदीपकडून यापुढेही समाजोपयोगी संदेश देणारी व्यंगचित्रांची निर्मिती होत राहो याच शुभेच्छा. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.




