ताज्या बातम्या

‘रावणा’ चित्रपटाचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओत यशस्वीरित्या पूर्ण;लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर :

कोल्हापूरच्या ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओत मराठी चित्रपट ‘रावणा’ चे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले. कोल्हापूर आणि परिसरातील विविध निसर्गरम्य ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग पार पडले. निर्माते अविनाश मुनजेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने मेहनतीने हे चित्रीकरण पूर्णत्वास नेले.
या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे सुरा एस. यांनी केले असून, कॅमेरामन म्हणून अक्कलकोट (महाराष्ट्र) येथील संजय हेळी यांनी काम पाहिले आहे. कलाकारांमध्ये भूषण पाटील, जयवंत वाडकर, गिरीश कुलकर्णी, कमलेश सावंत, गणेश यादव, साऊथचे कबीर सिंह तसेच अभिनेत्री स्नेहा सोनवणे यांचा समावेश आहे.
डीओपी असिस्टंट म्हणून आर्या बोराडे व ऋषी पिजारी यांनी काम केले. ड्रेस डिपार्टमेंटची जबाबदारी देवयानी व्यवहारे यांनी सांभाळली, तर स्टिल कॅमेरासाठी ए. जी. नारायण (साऊथ) यांनी योगदान दिले. लाईट डिपार्टमेंटमध्ये मंगेश लिंगनूरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, मंगेश लिंगनूरकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत साऊंड तज्ज्ञ बाबा लिंगनूरकर यांचे नातू आहेत. साऊंड डिपार्टमेंटही इंडस्ट्रीतील अनुभवी टीमकडून सांभाळण्यात आले आहे.
कोल्हापूरचे प्रोडक्शन मॅनेजर दादासाहेब पाटील यांनी स्थानिक पातळीवरील व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. प्रोडक्शन विभागात संजय शिंदे व किरण सोनवणे यांनी काम पाहिले. मेकअप डिपार्टमेंटमध्ये हरिकेश कांबळे, निलेश काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले.
कराड तालुक्यातील डोंगरपायथ्याशी वसलेल्या घोगाव गावातही काही महत्त्वाचे चित्रीकरण झाले. या गावचे ग्रामदैवत श्री बाळसिद्ध आणि नगरीत विराजमान असलेल्या आई रेणुका माता मंदिरात चित्रपट टीमच्या वतीने दर्शन घेण्यात आले.
शूटिंगदरम्यान कोकण व पश्चिम महाराष्ट्र एसटी प्रेमी समितीचे जावेद मुलानी व नरेंद्र कांबळे यांनी सेटला भेट देऊन एसटीचे रूट बोर्ड चित्रपटाच्या टीमकडे सुपूर्द केले. तसेच आई रेणुका माता मंदिर व एसटी प्रेमी समितीच्या वतीने चित्रपटाला शुभेच्छा देण्यात आल्या.
चित्रपटाचे सहनिर्माते आशिष गुंजेकर (उर्फ ए. जी.) असून, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती साळुंखे मामा (कोल्हापूर) व त्यांचे सहकारी चिंबळा भाई यांनी दिली आहे.

Scroll to Top