उंडाळे(अमोल पाटील) : उंडाळे–चांदोली मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, पालक आणि स्थानिक संस्थांकडून रस्त्यावर रंबलर बसवण्याची मागणी केली जात होती. अनेक जीवितहानी होऊनही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची दखल घेत उंडाळे येथे रस्त्यावर रंबलर बसवण्याचे काम हाती घेतले असून आता ते पूर्ण झाले आहे.
स्वतंत्र सैनिक दादासाहेब उंडाळकर विद्यालयासह ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे व ढेरे यांना तातडीने रंबलर बसवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार युनिटी बिल्डर्सचे सुभाष शिंदे आणि नितीन शेळके यांनी चार ठिकाणी रंबलर बसवण्याचे काम सुरू केले.
कामाची पाहणी करताना सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, प्रमोद पाटील, राहुल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
उंडाळे बसस्टँड परिसरात शाळेच्या गेटपासून अवघ्या दहा ते पंधरा फुटांवर पूर्व–पश्चिम असे दोन रंबलर बसवले असून वाडी–जिंती चौकातही आणखी दोन रंबलर बसवण्यात येणार आहेत. रंबलर बसवल्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होणार असून दुर्घटनांचे प्रमाण घटण्याची सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उंडाळेसह परिसरातील नागरिकांनी या कामाचे कौतुक केले असून “रस्ते सुरक्षिततेकडे मोठे पाऊल” अशी भावना व्यक्त केली आहे.




