ताज्या बातम्या

कराड–मलकापूरचा चेहरामोहरा बदलणार; अतुलबाबांवर फडणवीस यांचा मोठा विश्वास

प्रतिनिधी : कराड आणि मलकापूरच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अतुलबाबा भोसले यांना “भविष्यातील मोठे नेता” म्हणून गौरवले. दत्त चौकात भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी “अतुलबाबांकडे विकासाची दृष्टी असून, त्यांची सर्व स्वप्ने आम्ही पूर्ण करू,” असा विश्वास व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले की, कराड–मलकापूर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी 14 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्राधान्याने केले जाईल. यशवंतराव चव्हाण समाधी क्षेत्राच्या पुनर्विकासाचे स्वप्न अतुलबाबांनी पाहिले असून ते स्वतः पूर्ण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अत्याधुनिक शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटी, खाशाबा जाधव स्मारकासाठी 25 कोटी, कराड–विटा महामार्ग, जोडरस्ते, पंचायत समिती, आंबेडकर वाचनालय, पाणीपुरवठा योजना अशा मिळून 400 कोटींच्या विकास निधीची माहितीही त्यांनी दिली.

कराड ही छत्रपती शिवरायांची भूमी असल्याचे सांगत, “कराड–मलकापूरमध्ये पुन्हा एकहाती सत्ता द्या; दोन्ही शहरं मॉडेल सिटी बनवू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यकाळातील कामांचा आढावा घेताना आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले की, एका वर्षात तब्बल 259 कोटींचा निधी त्यांनी शहरासाठी मिळवला. शिवाजी स्टेडियम, विमानतळ विस्तार, नवीन कोयना पूल, नवीन नगरपालिका इमारत या प्रमुख योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. आगामी काळात कृष्णा नदीची आरती, पूर संरक्षण भिंत, नेकलेस रोड यांसारख्या कामांवर भर देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

मलकापुरात भाजपने आधीच सहा जागा बिनविरोध जिंकल्या असून उर्वरित जागांवरही 22–0 विजय मिळवू, असा विश्वास अतुलबाबांनी व्यक्त केला. सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Scroll to Top